Man Maazhe

मन माझे !

मन वारा, मन पसारा,
मनाचा पिंगा, मनाचा दंगा.
मनात मी, माझ्यात मन,
गुण किती त्याचे, किती अवगुण.

मन सागर, मन डबके,
मन वीज, मन पाउल हलके.
मन अंधार, मन आधार,
मन स्वप्नांचा मोठा बाजार.

मन आनंदाची उकळी,
मन गर्द काळी पोकळी,
मन वात्सल्याचा झरा,
मन अभिमानाचा मळा.

मन नागिणीचा फणा,
मन शुभ्र मोत्यांचा दाणा.
मन तू अन मन मी,
मनाचे गूढ सांगू किती?

मन चिंता, मन गुंता,
मन रानातल्या पाउल वाटा.
मन डोळ्यांची ओली किनार,
मन सुबक ठेंगणे वृक्ष चिनार.

मन सगे, मन सोबती,
मन, मनात दर्वल्णारी प्रीती.
मन राग, मन लोभ,
मन असीम आनंदाचा डोह !

मन विचार, मन आचार,
मन जीवन मर्माचे सार.
मन दिशा, मन नशा,
मन नव नवलायीची उषा.

मन सांझ, मन सकाळ,
मन फुटके करंटे कपाळ.
मन झोका, मन धोका,
मन प्रेमातल्या आणा भाका.

मन आतुर, मन फितूर,
मन जंगलातला कोल्हा चतुर.
मन शांत, मन अशांत...... मन माझे एक अनोळखी प्रांत !
मनाचे रुसवे, मनाचे फुगवे,
मन तृणाचे मखमल हिरवे.
मन म्हणजे दिशा चार,
मन मुक्त वाऱ्याचा संचार.

मन रिझवी, मन फसवी,
मन एका क्षणात हसवी.
मनात विश्व, विश्वात मन,
मन कधी अणु रेणूंचे कण.
मनाचा माझ्या लागेना थांग,
हरे कृष्ण, आता तरी धाव !

Comments

Popular posts from this blog

Compulsive Creations

The path